विकास शहाशिराळा : बिऊर ( ता.शिराळा ) गाव आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करुन मुंबई मार्केटमधे अल्पावधीत गवती चहाचे गाव अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.अल्प भुधारक व शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत आसून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अलिकडच्या काही वर्षात वातावरणातील बदल पावसाची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.परिणामी शेतीवरती उदरनिर्वाह असणारे शेतकरी वर्षभर उत्पादन देणाऱ्या पिकाकडे कल वाढलेला पहावयास मिळत आहे.गवती चहा ही तृणवर्गीय वनस्पती असून एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरु होते. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करता येते.साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात. गेल्या चार पाच वर्षापासून या परिसरात काही शेतकऱ्यांनी हे पिक घ्यायला सुरवात केली. अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला.मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जिवानू खताचा वापर करुन गावखताचा मोठ्या प्रमाणात वापर व पाण्याचे योग्य नियोजन वेळेवर आंतरमशागत किटकनाकांचा वापर याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरूवात झाली. मुंबई मार्केटमध्ये या तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत त्यामुळे येथे मार्केटला माल पाठवायला सुरूवात झाली. या परिसरात लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची योग्य जमीन जमीन आहे.त्यामुळे कमी खर्चात ऊसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे.अलिकडच्या काळात खूप जण गवती चहा पिणे पसंत करतात. गवती चहा ही अशी वनस्पती आहे ज्यामुळे चहाची चव वाढते. यामुळे बऱ्याच जणांच्या घरी अगदी आवर्जून गवती चहा पितात. त्याचबरोबर यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळतो.
योग्य नियोजन गवती चहा हे पिक इतर पिकापेक्षा परवडणारे आहे व कमी खर्चात कमी क्षेत्रात येते.त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या पिकाला करपा रोगाचा प्रार्दुर्भाव जास्त असतो.वेळेवर औषध फवारणी केली तर नियंत्रण करता येते. - सचिन पाटील ( माजी सैनिक ) शेतकरी बिऊर - शांतीनगर