सांगली : ‘मम्मी.., हे पप्पांना मारून आलेत काय..?’ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या ‘सनकी’ मारहाणीत बळी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या तीन वर्षीय प्रांजलचा भाबडा प्रश्न अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांना निरूत्तर करून गेला. बिहारी यांनी प्रांजलच्या गालावर मायेचा हात फिरवून अनिकेतच्या मारेकºयांना कोणतीही दयामाया दाखविली जाणार नाही, असा दिलासा कोथळे कुटुंबियांना दिला.अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक बिहारी शुक्रवारी सांगलीत आले होते. शनिवारी दुपारी त्यांनी कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगरमध्ये अनिकेतच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे होते. बिहारी यांनी भेट देताच अनिकेतची पत्नी संध्या तीन वर्षीय मुलगी प्रांजल हिला घेऊन बाहेर आली. प्रांजलने ‘मम्मी, हे कोण आहेत’? असा प्रश्न विचारला. ते पोलिस असल्याचे सांगताच प्रांजलने ‘मम्मी, हे पप्पांना मारून आलेत काय?’, असा प्रश्न केला. बिहारी यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाºयांना तिचा प्रश्न निरुत्तर करून गेला.या भाबड्या प्रश्नाने सर्वांच्याच हृदयात कालवाकालव झाली. अधिकाºयांना काहीच बोलता आले नाही. बिहारी यांनी प्रांजलच्या गालावरून हात फिरविला. कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यांना कोणतीही दयामाया दाखविली जाणार नाही, असा दिलासा बिहारी यांनी दिला.
मम्मी.., हे पप्पांना मारुन आलेत का? चिमुरडीचा भाबडा सवाल - अधिकारी निरुत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 1:08 AM