इस्लामपूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकूण १४ प्रभागांसाठी ३ नियंत्रण अधिकारी आणि २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिका प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजनांची आखणी केली आहे. यापुढे कोविड-१९ नियमावलीचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
ते म्हणाले, शहरामध्ये आतापर्यंत एकूण ३२२ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. तेथील २६६ जणांवर घरीच विलगीकरणात उपचार सुरू आहेत. ५ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात तर ३६ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले १५ रुग्ण शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. एप्रिल महिन्यात ७४ मृत रुग्णांवर कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत ठेकेदाराकरवी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामध्ये शहरातील १० रुग्णांचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील २७ तर बाहेरील जिल्ह्यातील ३७ मृत रुग्णांचा समावेश होता.
माळी म्हणाले, शहरामध्ये घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून घरावर लावलेले कोविड-१९चे स्टिकर काढून टाकणे, तसेच बाहेर फिरून येणे, परिसराचे सॅनिटायझेन करू न देणे अशा पद्धतीने कोविड नियमावलीचा भंग करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची घरे सील करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला शासकीय विलगीकरण केंद्रात धाडले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शहरी आरोग्य केंद्रातील आशासेविका कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन तपासणी करीत आहेत.
चौकट
...अन्यथा कंटेन्मेंट झोन
पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरात यापुढे कंटेन्मेंट झोन लावले जाणार आहेत. ज्या गल्लीत पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतील, अशा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन करून हा परिसर सील केला जाणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन माळी यांनी केले आहे.