कुपवाड : महापालिका क्षेत्रातील तिन्ही शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारा खर्चिक असा असलेला उपभोक्ता कर प्रशासनाने कायमस्वरूपी रद्द करावा. शहराच्या विकासासाठी आयुक्तांनी कुपवाडमध्ये आठवड्यातून एक दिवस पूर्ण वेळ द्यावा, अशी मागणी गुरुवारी कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली.
कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली. यावेळी संघर्ष समितीच्यावतीने लेखी निवेदन देऊन कुपवाडच्या प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा केली.
महापालिका स्थापन झाल्यापासून सांगली, मिरजेच्या तुलनेत कुपवाड शहरात ठोस अशी विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे कुपवाडसाठी स्वतंत्र मुबलक निधी देऊन विविध विकासात्मक योजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याबरोबरच मनपा क्षेत्रातील उपभोक्ता कर रद्द करण्यात यावा. आयुक्त यांनी प्रभाग समिती तीनच्या कार्यालयामध्ये आठवड्यातील एक दिवस हजर राहून कुपवाडसाठी वेळ द्यावा, आदी मागण्या केल्या. याबाबतचे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले. यावेळी आयुक्तांनी कुपवाडकरांना नक्की न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, सचिव विलास माळी, खजिनदार प्रकाश व्हनकडे, संचालक परवेज मुलाणी, सागर खोत, विठ्ठल संकपाळ, आशुतोष धोतरे, गोरख व्हनकडे, संजय तोडकर, संदीप कांबळे, समीर मुजावर, रमेश जाधव उपस्थित होते.
फोटो-२४कुपवाड०१
फोटो ओळ - कुपवाड संघर्ष समितीच्या वतीने आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कुपवाड संघर्ष समितीचे सनी धोतरे, अनिल कवठेकर, विठ्ठल संकपाळ, रमेश जाधव उपस्थित होते.