सांगली : गेली पस्तीस वर्षे तत्कालीन सांगली नगरपालिका व सध्याच्या महापालिकेवर एकहाती अधिराज्य गाजविणाऱ्या माजी मंत्री मदन पाटील यांच्या पश्चात महापालिकेचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. मदनभाऊ निष्ठावंत नगरसेवकांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापुढे महापालिकेत जयश्रीतार्इंचाच शब्द अंतिम राहील, असे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. मदन पाटील यांनी सांगली नगरपालिकेचे नगरसेवकपद, नगराध्यक्षपद भूषविले. १९९८ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. पहिल्याच निवडणुकीत मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली होती. त्यानंतर दुसरी निवडणूकही त्यांनी निर्विवादपणे जिंकली. २००८ मध्ये मात्र त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसला होता. पण २०१३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती सत्ता हस्तगत केली होती. गेली पस्तीस वर्षे मदन पाटील यांनी नगरपालिका व सध्याच्या महापालिकेचे नेतृत्व केले. महापालिकेचा कारभार सांभाळणे तसे कसरतीचे काम आहे. नाना तऱ्हेच्या नगरसेवकांना एकाच छताखाली ठेवण्याची धमक मदनभाऊंकडे होती. त्यांच्या नजरेतच जरब होती. त्यामुळे भाऊंचा आदेश आला की सारे नगरसेवक एक होत. त्यांच्या पश्चात महापालिकेची सूत्रे कोणाकडे जाणार, याची चर्चा सुरू होती. आता त्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटातून केला जात आहे. महापालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर ४२ नगरसेवक निवडून आले आहेत. तीन नगरसेवक स्वीकृत आहेत. त्यापैकी २५ नगरसेवक मदनभाऊनिष्ठ मानले जातात. या नगरसेवकांनी मदनभाऊंच्या पश्चात त्यांच्या पत्नी जयश्रीताई यांच्याकडे महापालिकेची सूत्रे सोपविण्यावर चर्चा केली. सोमवारी काँग्रेसच्या पक्षबैठकीत त्याला बहुतांश नगरसेवकांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेचे नेतृत्व जयश्रीताई करणार, हे स्पष्ट झाले आहे. पण अद्याप जयश्रीतार्इंनी राजकारणात सक्रिय होणार की नाही, याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी मंगळवारी महासभेनंतर सर्व नगरसेवक जयश्रीतार्इंची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांना भेटून मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे साकडेही त्यांना घातले जाणार आहे. महापालिकेसह विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही जयश्रीतार्इंच्या नावासाठी आग्रह धरला आहे. रक्षाविसर्जनावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी, जयश्रीतार्इंना ताकद देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. आता महापालिकेतील नगरसेवकांनीही जयश्रीतार्इंवर विश्वास दाखविला आहे. मंगळवारी महासभेचे कामकाज संपल्यानंतर नगरसेवक जयश्रीतार्इंची भेट घेऊन साकडे घालणार आहेत. या पक्षबैठकीला गटनेते किशोर जामदार, महापौर विवेक कांबळे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, सुरेश आवटी, संजय मेंढे यांच्यासह बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदनभाऊंचे स्मारक : पुतळाही उभारणारमहापालिकेच्यावतीने मदन पाटील यांचा पुतळा व स्मारक उभारण्यावरही बैठकीत चर्चा झाली. सुरेश आवटी यांनी मदनभाऊंच्या जयंतीपूर्वी म्हणजे २ डिसेंबरपर्यंत पुतळ्याचे काम गतीने करण्याची सूचना मांडली. वसंतदादा स्फूर्ती स्थळावर मदनभाऊंचे स्मारक उभारले जाणार आहे. तसेच शहरातील महापालिकेच्या खुल्या जागेवर मदनभाऊंचा पुतळा व उद्यान उभे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच जागांची निश्चिती केली जाईल. सध्या माधवनगर रस्त्यावरील टीव्हीएससमोरील भूखंड, विजयनगर येथील खुला भूखंड अशा दोन ते तीन जागांचा विचार सुरू आहे. महासभा झाली रद्दमहापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी होत आहे. मदन पाटील यांच्या निधनाने ही सभा रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला आहे. सभेची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मदनभाऊंना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
महापालिकेची सूत्रे जयश्रीतार्इंकडे येणार!
By admin | Published: October 19, 2015 11:06 PM