मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक झाली. यामुळे येथील कारभार चव्हाट्यावर आला आहे. आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने मिरज कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र कारभार आहे. महापालिकेत समावेशानंतर मिरजेच्या विकासाची अपेक्षा फोल ठरली असून, मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार अधिकाºयांऐवजी कारभारी नगरसेवकच चालवत असल्याचे चित्र आहे.
२० वर्षांपूर्वी मिरज शहराचा समावेश होऊन महापालिका अस्तित्वात आल्यानंतर येथील कारभारावर कायम मिरजेतील नेत्यांचाच वरचष्मा राहिला आहे. महापालिकेचे मिरज विभागीय कार्यालय केवळ जावक-आवक टेबल बनले आहे. मिरज विभागीय कार्यालयात बांधकाम, नगररचना, आरोग्य, जलनिस्सारण, जन्म-मृत्यू, विवाह नोंद, मालमत्ता, कर संकलन आदी विभागातील प्रभारी अधिकारीच जागेवर नसल्याने, या विभागाचा कारभार शिपाई किंवा हंगामी कर्मचारीच चालवतात, अशी अवस्था आहेत. मुख्यालयात बैठकीसाठी अधिकारी कार्यालयातून गायब असतात. मिरज कार्यालयाची दुरवस्था झाली आहे.
नागरिक व कर्मचाºयांसाठी एकमेव शौचालय अस्वच्छ आहे. कार्यालयाच्या भिंती या मावा व गुटख्याच्या पिचकाºयांनी रंगल्या आहेत. शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. वरिष्ठ अधिकारी जागेवर नसल्याने येथील कर्मचाºयांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. नगररचना विभागात बांधकामसह अन्य कामांसाठी विलंबाचे हत्यार वापरण्यात येते. मानधनावरील कर्मचारी या विभागाचे कामकाज पाहतात. कारभारी नगरसेवकांच्या बगलबच्च्यांना नगररचना विभागात नियुक्ती देत आहे. नगररचना विभागात काम करण्यासाठी कर्मचाºयांत स्पर्धा आहे.अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेमिरज विभागीय कार्यालयाला शिस्त नसल्याने कर्मचारी कधीच वेळेवर येत नाहीत. महिनाभरापूर्वी घरपट्टी कमी करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी करनिर्धारक विभागातील लिपिक नितीन उत्तुरे व विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणारा अजित राजमाने या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच कार्यालयातील अधिकाºयांसह कर्मचारीही बेताल झाले आहेत. महापौर संगीता खोत मिरजेच्या आहेत. मिरज कार्यालयातील भोंगळ कारभाराला चाप लावण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.