सांगली : महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी विभागाच्या ‘एकत्रिकरण’ला विरोध करत सोमवारी या दोन्ही विभागातील कर्मचार्यांनी ‘काम बंद’ आंदोलन केले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, घरपट्टी व पाणीपट्टी हे दोन वेगवेगळे विभाग आहेत. मात्र आता या विभागाकडील कर्मचार्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी या दोन्ही विभागाकडील काम करावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी विरोध केला आहे.
घरपट्टी व पाणीपुरवठा विभागाकडील कामाचे स्वरूप वेगवेगळे असताना, दोन्ही विभागाकडील कामे एकाच कर्मचार्याकडून करून घेणे अन्यायी आहे. काही अधिकार्यांच्या मनमानी कल्पनेतून हे दोन्ही विभाग एकत्र करण्याचा घाट घातला जात आहे, अशी तक्रार कर्मचार्यांनी केली.
मूळ कामाबरोबरच कोरोना लसीकरण सर्व्हे, अँटिजेन तपासणी, हॉस्पिटलमधील महत्त्वाची जबाबदारी, वाॅर्ड समन्वय अधिकारी... अशी अनेक कामे हे कर्मचारी करत आहेत. मात्र त्यांना कोरोनापासून सुरक्षिततेची कोणतीही सामग्री दिली जात नाही. जबरदस्तीने काम करवून घेतले जात आहे. याप्रकरणीही लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.