लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप होत असल्याचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेला जाग आली. अतिक्रमण विभागाच्या पथकाने या फुकट्यांना दणका देत बेकायदा फलक जप्त केले.
बेकायदा फलकामुळे शहराला बकाल रूप आले आहे. विशेषत: उपनगरातील चौकात अशा फलकांचे पेव फुटले आहे. फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते; पण अनेक खासगी संस्था, बिल्डर, व्यापारी, दुकानदारांनी परवानगी न घेता झाडांवर, विद्युत खांबावर फलक लावले आहेत. मुख्य चौकासह रस्त्यावरही अनेक बेकायदा फलक आहेत. यावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला.
या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या फुकट्या जाहिरातदारांवर कारवाईचा बडगा उगारला. झाडे, खांबावरील छोटे फलक हटविण्यात आले. चौकातील मोठ्या फलकावरही कारवाई करण्यात आली.
चौकट
१५८ फलक जप्त
सांगली शहरातील स्टेशन रोड, वखारभाग, गणपती पेठ, कोल्हापूर रोड, सांगलीवाडी, बायपास रोडवर विनापरवाना आणि बेकायदा लावण्यात आलेले डिजिटल फलक हटविले. यामध्ये छोटे-मोठे १५८ फलक या कारवाईवेळी हटविण्यात आले. याचबरोबर शहरात कोणीही विनापरवाना डिजिटल फलक उभारू नयेत व उभारल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे.