मिरजेतील कृष्णाघाट स्मशानभूमीमधील डिझेलदाहिनी दीड वर्षापासून बंद होती. आधार सेवा संस्थेच्या पाठपुराव्यानंतर डिझेलदाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन तांत्रिक चाचणीही पार पडली. मात्र डिझेलदाहिनी वापरासाठी कार्यान्वित होण्यासाठी महापालिका प्रशासनाने अद्याप निविदा काढली नसल्याने ठेकेदाराची नेमणूक झालेली नाही. कोरोनाकाळातही अन्य विकासकामांच्या कोट्यवधींच्या निविदा काढण्यात येऊन त्या मंजूरही झाल्या आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा असलेल्या डिझेलदाहिनीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा काढण्यास मात्र दीड महिन्यापासून टाळाटाळ सुरू आहे. महापालिका आरोग्याधिकाऱ्यांना ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा काढण्यास वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे डिझेलदाहिनी सुरू करण्यासाठी वारंवार मागणी करूनही याकडे लक्ष देण्यात आले नाही. कृष्णाघाट स्मशानभूमीत लाकूड पुरवठा करणारा ठेकेदार कारभारी नगरसेवकाचा बगलबच्चा असल्याने नागरिकांच्या गैरसोयीकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. कृष्णाघाट येथील डिझेलदाहिनी तातडीने सुरू करण्यासाठी भाजपतर्फे भाजपचे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.