लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दरवर्षी पॅचवर्कच्या कामासाठी निविदा काढून महापालिका एक ते सव्वा कोटी रुपये खर्च करीत होती. आता महापालिकेने स्वत:ची पॅचवर्क यंत्रणा कार्यान्वित केल्याने मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही कौतुक केले.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वार्षिक सव्वा कोटींचा खर्च केला जातो. यासाठी प्रत्येक प्रभाग समितीला २५ लाखाचा निधी दिला जातो. पॅचवर्क कामासाठी वार्षिक निविदाही काढाव्या लागतात. निविदा प्रक्रियेतच बहुतांश वेळ जातो. त्याचप्रमाणे पॅचवर्क कामासाठी ऐनवेळी ठेकेदार किंवा अन्य एजन्सीकडून दिरंगाई होत असल्याने अनेकदा पॅचवर्क कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे महापालिकेने स्वत:ची पॅचवर्क यंत्रणा उभी करून कामगिरी करण्याचा निर्णय घेतला होता.
निर्णयानुसार पॅचवर्क कामासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणाच खरेदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ रोलर, २ बॉयलर मशीन आणि २ ट्रॅक्टरचा समावेश आहे. यासाठी १ मुकादम आणि ८ मजुरांची आवश्यकता असून त्यांचीही वार्षिक टेंडर पद्धतीने भरती केली जाणार आहे. पॅचवर्क कामासाठी लागणारे साहित्य पुरवण्यासाठी वार्षिक निविदा काढण्यात आल्या आहेत.
आयुक्त कापडणीस यांच्या या नियोजनामुळे महापालिकेची वार्षिक १ कोटींची बचत होणार आहे. शिवाय तात्काळ पॅचवर्क कामही करता येणार आहे.
महापालिकेच्या या नव्या यंत्रणा महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या असून बुधवारपासून प्रत्यक्ष पॅचवर्क कामास सुरुवात केली आहे. शहरातील अंबा भुवन ते जुना बुधगाव रोडवरील रस्ते पॅचवर्क कामास सुरुवात केली. या कामाची पाहणी आयुक्त कापडणीस यांनी केली. यावेळी शहर अभियंता संजय देसाई, उपअभियंता आप्पा हलकुडे, अभियंता वैभव वाघमारे आदी उपस्थित होते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही या कामास भेट देऊन पाहणी केली.