ओळी : महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकीपोटी मंगलधाम संकुलातील दुकानगाळा सील केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात मालमत्ता कर न भरणाऱ्या दुकान गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गुरुवारी मंगलधाम व्यापारी संकुलातील एक दुकानगाळा सील करण्यात आला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने सहायक आयुक्त तथा मालमत्ता व्यवस्थापक पराग कोडगुले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महापालिकेच्या मालमत्ता करापोटी तीन कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत दीड कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. यामध्ये अजूनही अनेक बडे गाळेधारक मालमत्ता कर भरत नसल्याचे समोर आले आहे. अशा थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी मालमत्ता व्यवस्थापकांना दिले होते.
त्यानुसार गुरुवारी मंगलधाममधील गाळा क्रमांक २१ सील करण्यात आला. या गाळ्याची तीन लाख रुपयांची थकबाकी आहे. दिवसभरात मालमत्ता विभागाने सव्वा चार लाखांची थकबाकी वसूल केली असल्याचे कोडगुले यांनी सांगितले. या कारवाईत रवी चौगुले, धनंजय हर्षद, अमित शिंदे, सुभाष केसरे आदींनी सहभाग घेतला आहे.
चौकट
थकबाकी भरा, अन्यथा कारवाई अटळ
शहरातील गाळेधारकांनी तातडीने थकबाकी रक्कम भरावी, अन्यथा त्यांचे गाळे सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक आयुक्त पराग कोडगुले यांनी दिला आहे.