कोरोना लसीकरण, आरोग्य सुविधांबाबत महापौरांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. सूर्यवंशी म्हणाले की, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. पहिल्या लाटेत महापालिका प्रशासनाने चांगले काम केले. पण दुसऱ्या लाटेत मात्र ढिलाई दिसत आहे. नगरसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. त्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील. सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. कोरोनाची स्थितीही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी महापालिकेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याबाबतही आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. त्यासाठी कॉल सर्व्हिस सेवा सुरू केली जाणार आहे. संबंधित आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध लसीनुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना संपर्क साधून बोलावून लसीकरण करून घेण्यात येईल, असेही सूर्यवंशी म्हणाले.
चौकट
रुग्णालयाकडून भीतीचा प्रकार : भोसले
नगरसेवक अभिजित भोसले म्हणाले, रक्तातील ऑक्सिजनची पातळी ८५ असणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालये भीती दाखवून दाखल करायला लावत आहेत. भीतीपोटी रुग्णांचे आरोग्य आणखी बिघडते. दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राकडून ऑक्सिजन पातळी चांगली असतानाही तेथेच उपचार न करता रुग्णांना सांगलीला पाठविले जात असल्याचा आरोप केला.