लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेने पूरकाळात ड्रोनद्वारे केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे २०२१ची पूररेषा निश्चित करावी. त्याचे अभिलेख तयार करावे तसेच बाधित ठिकाणांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची सूचना जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगलीतील गणपती पेठ, कृष्णामाई घाट, भाजी मंडई, साठे नगर, सिध्दार्थ नगर या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आयुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त राहुल रोकडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात ८ ते १० उपनगरे अजूनही पाण्याखाली आहेत. पाणी ओसरलेल्या भागात तातडीने स्वच्छता मोहीम सुरु करावी. ड्रेनेज वाहिन्या तुंबल्या आहेत, त्या रिकाम्या कराव्यात. निवारा केंद्रातील कुटुंबे घरी परतत आहेत. घरांच्या परिसराची स्वच्छता करत आहेत. त्यांनी दक्षता घेऊन स्वच्छता करावी. विद्युत उपकरणे सुरु करताना काळजी घ्यावी. महापालिकेच्यावतीने ड्रोनद्वारे पुराचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याआधारे २०२१ची पूररेषा निश्चित करावी. लॅप्टोस्पारोसिसची साथ पसरु नये, यासाठी प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप, औषध फवारणी आदीवर भर द्यावा, अशी सूचना केली. आयुक्त कापडनीस म्हणाले, महापालिकेची २०० वाहने व सफाई यंत्रे तसेच दोन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून आलेले स्वच्छता पथकही कार्यरत झाले आहे. शहरातील तातडीने कुजणारे पदार्थ व कागद यांच्या स्वच्छतेबरोबरच साचलेला मातीसदृश्य गाळ काढण्याला प्राधान्य दिले आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरु झाल्याचे सांगितले.