सांगली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही लाट येण्यापूर्वीच महापालिकेने मुलांसाठी एक हजार बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभे करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
याबाबत आयुक्त, महापौरांना निवेदनही दिले.
यावेळी रावसाहेब घेवारे, पंडितराव बोराडे, अनिल शेटे, जितेंद्र शहा, बाळासाहेब मगदूम, लक्ष्मण वडर, अर्जुन माने उपस्थित होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुलांसाठी रुग्णालय सुरू केले आहे. त्याच धर्तीवर सांगली महापालिकेने तयारी करावी. सध्या महापालिकेकडून १२५ सिलिंडरची क्षमता असलेला ऑक्सिजन प्लांट उभारला जात आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे या ऑक्सिजन प्लांटची क्षमता ५०० सिलिंडरपर्यंत वाढवावी. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी खास बाब म्हणून एक लाख इंजेक्शन खरेदी करून साठा करावा. तसेच जिल्हा प्रशासनानेही मुलांसाठी रुग्णालय सुरू करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.