ओळी : शहरातील आस्था निवारा केंद्रात महापालिकेच्या वतीने बेघरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, डाॅ. वैभव पाटील, ज्योती सरवदे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील बेघरांच्या लसीकरणाचा प्रश्न गंभीर बनला होता. अखेर केंद्र शासनाने बेघरांच्या लसीकरणाबाबत नियमावली प्रसिद्ध केल्याने त्यांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला. मंगळवारी महापालिकेच्या वतीने ४० बेघरांचे लसीकरण करण्यात आले. उर्वरित बेघरांचे बुधवारी लसीकरण केले जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने सांगली व मिरज या दोन ठिकाणी बेघरांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. सांगलीतील निवारा केंद्रात ६६, तर मिरजेच्या केंद्रात ५२ बेघर आहेत. या बेघरांना जेवण, औषधोपचारापासून सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सांगलीतील निवारा केंद्रातील ६५ बेघर बाधित झाले होते.
सध्या सर्वत्र कोरोना लसीकरण सुरू आहे; पण बेघरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या बेघरांकडे आधारकार्ड व इतर कोणतेच ओळखपत्र नसल्याने आरोग्य पोर्टलला नोंद होत नव्हती. त्यामुळे खास बाब म्हणून त्यांचे लसीकरण करावे, अशी मागणीही जोर धरत होती. अखेर केंद्र शासनानेच त्यासंदर्भात निर्देश देत बेघरांच्या लसीकरणाला मान्यता दिली. उपायुक्त स्मृती पाटील यांनी या बेघरांना महापालिकेच्या वतीने ओळखपत्र देत त्यांची पोर्टलला नोंद केली. त्यानंतर मंगळवारी मिरजेतील ५२ पैकी ४० बेघरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. उर्वरित बेघर हे १८ ते ४५ वर्षांखालील आहेत. आता बुधवारी सांगलीतील ६६ बेघरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. यावेळी डाॅ. वैभव पाटील, समन्वयक ज्योती सरवदे उपस्थित होत्या.