शीतल पाटील ल्ल सांगली गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून महापालिकेतील सत्ताधारी मदनभाऊ गटाला डोकेदुखी ठरलेला विशाल पाटील गट पहिल्यांदाच बॅकफूटवर गेला आहे. स्थायी समिती सदस्य निवडीत मदनभाऊ गटाने विशाल पाटील व संभाजी पवार गटाला कायद्याच्या कात्रीत पकडत मात दिली. त्यामुळे पुढील दोन वर्षात पालिकेतील राजकारणात या दोन गटातील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. त्यातून एकमेकांच्या भानगडी बाहेर पडणार असून, शह-कटशहाचे राजकारण शिखरावर पोहोचण्याचे संकेत आहेत.महापालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मदनभाऊ पाटील यांनी जुन्या-नव्यांचा मेळ घालत अनेकांना पदे दिली. नवखे असलेले विजय घाडगे, वंदना कदम, अनुभवी सदस्य अनारकली कुरणे यांना स्थायी समितीत संधी दिली, तर सुनीता खोत यांना प्रभाग सभापती केले. स्वीकृत नगरसेवकावरून काँग्रेसमध्ये रणकंदन होऊनही शेखर माने, गजानन मगदूम यांना मदनभाऊंनी पाठबळ दिले. पण या साऱ्याच सदस्यांनी मदनभाऊंच्या निधनानंतर विशाल पाटील यांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी उघड पंगा घेतलेल्या संभाजी पवार गटाची साथ मिळाली. स्वाभिमानी आघाडीची अनेक शकले झाली आहेत. कोण भाजपमध्ये आहे, तर कोण शिवसेनेत! तरीही या आघाडीतील पवार गटाचे चार निष्ठावंत नगरसेवकांसह जनता दल व सहयोगी सदस्यांना बरोबर घेऊन उपमहापौरांच्या नावाखाली पालिकेत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही नवी आघाडी सत्ताधारी मदनभाऊ गटाला नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. महापौर निवडीवेळी मदनभाऊ गटाला साथ देणारे नगरसेवकही याच आघाडीतील आणि नंतर महासभा व सभागृहाबाहेर त्यांच्या कारभाराला विरोध करणारेही तेच! गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पालिकेत विशाल पाटील गटाचे उपद्रवमूल्य वाढले. या गटाने काही भानगडी चव्हाट्यावर आणल्या, हे नाकारून चालणार नाही. खोकीधारकांचे पुनर्वसन, भूसंपादन, स्थायी समितीतील भानगडी अशा काही बाबींतील आर्थिक तडजोडी त्यांनी उघड केल्या. पण त्याचवेळी काही गोष्टींबाबत या गटाने पाळलेले सोयीस्कर मौनही त्यांच्या भूमिकेबद्दल संशयकल्लोळ निर्माण करते. विशाल पाटील गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी मदनभाऊ गट बऱ्यापैकी बॅकफूटवर गेला होता. मदनभाऊ गटाला राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा असतानाही, अनेक निर्णयात त्यांना माघार घ्यावी लागली होती. पण स्थायी समिती सदस्य निवडीत मात्र या गटाने पुन्हा बाजी मारली. स्थायी समितीवरील वर्चस्व कायम राखत मदनभाऊ निष्ठावंतांना संधी देण्यात आली. हे करताना प्रादेशिक समतोल व भविष्यातील राजकारण याचा विचार करून इद्रिस नायकवडी यांनाही सोबत घेण्याची खेळी खेळली. जाता-जाता उपमहापौर गटाला दणका देत त्यांच्यापैकी एकालाही स्थायीत प्रतिनिधीत्व दिले नाही. त्यामुळे या गटाची सारी मदार स्वाभिमानी आघाडीवर होती. स्वाभिमानीचे दोन सदस्य स्थायी समितीत गेल्यास तेथील ‘अंडरस्टँडिंग’चा कारभार बाहेर येणार होता. पण त्यालाच मदनभाऊ गटाने शह दिला. स्वाभिमानीतील भाजपचे सदस्य असलेले युवराज बावडेकर, स्वरदा केळकर यांना पुढे करीत मदनभाऊ व राष्ट्रवादी काँग्रेसने विशाल पाटील गटावर चाल खेळली. स्वाभिमानीच्या सदस्यांचा विरोध असेल, तर दोन सदस्यांची नियुक्ती कशी करायची? असा प्रश्न उपस्थित करीत, तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर विशाल पाटील गटाला तात्पुरते का होईना, बॅकफूटवर ढकलले आहे. स्थायी सदस्य निवडीवर आता कायद्याची लढाई लढली जाईल. त्यात जय-पराजय कोणाचा होईल, हा भाग वेगळा. पण मदनभाऊ गटाने मात्र सावध चाल खेळली. स्वाभिमानीच्या गटनेत्याचा बंद लिफाफा महापौरांनी घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयानंतर हा लिफाफा फोडून त्यांची नावे वाचली जातील, याची हमी त्यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने स्वाभिमानीची मान्यता रद्दच केली, तर त्यांच्या कोट्यातील दोन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीला मिळतील आणि मान्यता कायम राहिली, तर त्यांचा लिफाफा फोडून दोन सदस्य स्थायीत येतील. त्यामुळे स्वाभिमानीचे भवितव्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यापूर्वीच दोन सदस्य स्थायीत जाण्यासाठी स्वाभिमानीला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी विभागीय आयुक्त, न्यायालयाच्या पातळीवर लढावे लागणार आहे. तेथून न्याय मिळाला तरच स्वाभिमानीला स्थायीत प्रतिनिधीत्व मिळेल. अन्यथा निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. विशाल पाटील व संभाजी पवार गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवून मदनभाऊ गटाने सध्या तरी बाजी मारली आहे. भविष्यात सदस्य निवडीचा निर्णय काहीही लागला तरी, स्थायी समितीवर मदनभाऊ गटाचेच वर्चस्व राहणार आहे. पण जाता-जाता विशाल पाटील व संभाजी पवार गटासमोर अडथळ्यांची शर्यत निर्माण करण्यात मदनभाऊ गटाला यश आले आहे. त्याला राष्ट्रवादीचीही तितकीच साथ मिळाली. त्यामुळे पालिकेत मदनभाऊ गट-राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध विशाल पाटील, संभाजी पवार गट असा सामना रंगणार आहे. विशाल पाटील गटाची दुहेरी भूमिकाउपमहापौर विजय घाडगे, शेखर माने ही मंडळी वारंवार काँग्रेसचे नाव घेतात. पालिकेत सत्ता काँग्रेसची आहे, सभापती काँग्रेसचा होणार, असे सभागृहात म्हणतात. पण त्याचवेळी ती काँग्रेसच्या महापौरांच्या निर्णयाविरोधात मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय? पदे घेताना काँग्रेस आणि नंतर मात्र विरोधक, अशी दुहेरी भूमिका या गटाकडून निभावली जात आहे.सत्तासंघर्षाचा शापमहापालिकेच्या शेवटच्या दोन वर्षात सत्तासंघर्ष उफाळून येतो. मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पालिकेला संघर्षाचा शाप लागल्याचे सूचक व्यक्तव्य केले होते. महाआघाडीच्या काळात इद्रिस नायकवडी यांनी बंड पुकारले होते. आता सत्ताधाऱ्यांत पुन्हा दुफळी माजली आहे. दोन वर्षात मदनभाऊ विरूद्ध विशाल पाटील गट असा सामना रंगणार आहे. मदनभाऊ गटाच्या भानगडींवर विशाल पाटील गटाचे लक्ष असेल, तर विशाल पाटील गटाच्या म्होरक्यांच्या भानगडी बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली आहे. खुद्द महापौरांनीच महिन्याभरात म्होरक्यांविरोधात बरेच खाद्य प्रसारमाध्यमांना देऊ, असे संकेत दिले आहेत.
महापालिकेत विशाल पाटील गट बॅकफूटवर
By admin | Published: September 02, 2016 11:22 PM