लोकमत न्येूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात शनिवारपासून (दि. १६) कोरोना लसीकरणाला सुरुवात होत आहे. गुरुवारी महापालिकेला १००० डोस देण्यात आले. कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रालाही ३०० डोस पुरविले गेले. सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांना शुक्रवारी लस पुरवली जाणार आहे.
बुधवारी कोल्हापुरातून सांगलीसाठी ३१ हजार डोस प्राप्त झाले. जिल्हा परिषदेतील लस भांडारात ती पोलीस बंदोबस्तात ठेवली आहे. तेथून जिल्हाभरात वितरित केली जाईल. प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ती दिली जाईल. नंतर सामान्य जनतेसाठी उपलब्ध होईल. आधार लिंक असणाऱ्या मोबाईलवर त्यासाठी संदेश मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी मोबाईलचे आधार लिंकिंग करून घ्यावे. लस पूर्णत: सुरक्षित आहे.
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील म्हणाले की, शनिवारी जिल्ह्यात बारा ठिकाणी एकाचवेळी लसीकरण मोहिमेला सुुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना ती मिळेल.
------------