सांगली : माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास विलंब केल्याबद्दल महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना सात प्रकरणात तब्बल ७० हजार रुपयांचा, तर डॉ. संजय कवठेकर यांना दोन प्रकरणात प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. हा दंड त्यांच्या पगारातून वसूल करावा, असे निर्देशही माहिती आयुक्तांनी दिले आहेत.
या तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील विविध प्रश्नांबाबतच होत्या. माहिती अधिकार कार्यकर्ता रामचंद्र जाधव यांनी एकूण सहा प्रकरणात आरोग्य विभागाकडे विविध प्रश्नांबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. याबाबत दिलेली माहिती अपुरी होती, तसेच त्यांनी माहिती आयुक्तांकडे केलेले अपीलही फेटाळले गेले.
बर्वे यांनीही अशाच एका प्रश्नाबाबत आरोग्य विभागाकडे माहिती मागवली होती. जाधव व बर्वे यांनी केलेल्या सात प्रकरणात डॉ. सुनील आंबोळे यांनी अपुरी माहिती दिली होती. त्याबद्दल त्यांना माहिती आयुक्तांनी नोटीसही बजाविली. त्यावर आंबोळे यांनी खुलासा केला होता; पण हा खुलासा अमान्य करीत आंबोळे यांनी प्रत्येक प्रकरणात दहा हजार असा एकूण ७० हजाराचा दंड ठोठावला.
याचप्रमाणे डॉ. संजय कवठेकर यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते संभाजी सांवत यांनी आरोग्य विभागाबाबत माहिती मागवली होती. दोन प्रकरणात माहिती अधिकार आयुक्तांनी डॉ. कवठेकर यांना प्रत्येकी पाच हजार असा एकूण दहा हजाराचा दंड ठोठावला आहे.