शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शहरातील आपटा पोलिस चौकीजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. रवींद्र बापू केसरे (वय ५२, रा. कसरे गल्ली, खणभाग, सांगली) मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिव्यांग असलेले केसरे यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्याने पालिकेच्यावतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला होता.
केसरे हे गेल्या पाच वर्षांपासून प्रधानमंत्री आवास योजनेचे सभापती जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून काम केले होते. आता ते वरीष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी आपटा पोलिस चौकीपासून ते दुचाकीवरून जात असताना त्यांना मोटारीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे. या घटनेची विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.