सांगली : येथील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २०१३मध्ये सुट्टी दिवशी केलेल्या कामाचा पगार देण्याची तयारी प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातील सुनावणीवेळी दर्शविल्याची माहिती कामगार सभेचे सचिव विजय तांबडे यांनी दिली. मार्च महिन्यात दोन टप्प्यात १ कोटी २७ लाख रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २०१२ ते २०१६ या चार वर्षांतील सुट्ट्यांचा पगार देण्यात आला नव्हता. याविरोधात महापालिका कामगार सभेच्यावतीने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने २०१२मधील पगार अदा केला. पण उर्वरित तीन वर्षांचा पगार अद्याप दिलेला नव्हता. औद्योगिक न्यायालयानेही सुट्ट्यांचा पगार देण्याचे आदेश दिले होते. तरीही त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पुन्हा कामगार संघटनेने आयुक्तांविरोधात याचिका दाखल केली.
त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी प्रशासनाच्यावतीने २०१३मधील सुट्ट्यांचा पगार मार्च महिन्यात देण्यात येईल, असे सांगण्यात आले. १८ मार्चपर्यंत ७१ लाख रुपये व मार्च अखेरीपर्यंत उर्वरित ५६ लाख ७८ हजार रुपये अशी १ कोटी २७ लाख रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा केली जाईल. तसेच उर्वरित तीन वर्षांच्या सुट्ट्यांच्या पगाराचा प्रस्ताव आयुक्तांकडे मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.