लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या स्थायी व स्वीकृत सदस्य निवडीवेळी शुक्रवारी सभागृहात मोठा गोंधळ उडाला. निवडी जाहीर करण्यापूर्वी महापौरांनी सभा तहकूब केल्याने भाजप व काँग्रेस सदस्य आक्रमक झाले. नगरसचिव चंद्रकांत आडके यांना नगरसेवकांनी सभागृहात रोखून धरले. पंधरा मिनिटे त्यांना घेराओ घालण्यात आला होता. अखेर महापौरांनी पुन्हा सभा सुरू केल्याने भाजप व काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास टाकला.
दरम्यान, स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक हरिदास पाटील यांची वर्णी लागली तर स्थायी सदस्यपदी भाजपकडून कल्पना कोळेकर, जगन्नाथ ठोकळे, निरंजन आवटी, गजानन आलदर, काँग्रेसकडून संतोष पाटील, फिरोज पठाण तर राष्ट्रवादीकडून मनगू सरगर, नर्सिग सय्यद, संगीता हारगे यांची निवड करण्यात आली.
महापालिकेची ऑनलाईन महासभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत स्थायी समितीच्या नऊ जागा व स्वीकृतच्या एका जागेसाठी निवड होणार होती. सभा ऑनलाईन असली तरी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, विवेक कांबळे, योगेंद्र थोरात आदी सदस्य सभागृहात उपस्थित होते.
विषय पत्रिकेवरील चार विषय संपल्यानंतर महापौर सूर्यवंशी यांनी सभा १५ मिनिटांसाठी तहकूब केली. त्याला विरोध करत भाजप व काँग्रेस सदस्य महापौरांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते गराड्यातून बाहेर पडले. नगरसचिव चंद्रकांत आडके यांना धीरज सूर्यवंशी, विनायक सिंहासने, विवेक कांबळे, संजय कुलकर्णी, संजय यमगर आदींनी गराडा घालून सभा सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. शेवटपर्यंत आडके यांना सदस्यांनी सभागृहाबाहेर सोडले नाही. अखेर महापौरांनी पंधरा मिनिटानंतर सभा सुरू केली. त्यानंतर स्वीकृत व स्थायी सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
चौकट
स्थायीचे नूतन सदस्य
भाजप : कल्पना कोळेकर, जगन्नाथ ठोकळे, निरंजन आवटी, गजानन आलदर.
काँग्रेस : संतोष पाटील, फिरोज पठाण.
राष्ट्रवादी : नर्गिस सय्यद, संगीता हारगे, मनगू सरगर.
स्वीकृत नगरसेवक : हरिदास पाटील
चौकट
हरिदास पाटील यांना लाॅटरी, बागवान यांना हुलकावणी
स्वीकृत नगरसेवक पदासाठी जमील बागवान यांचे नाव आघाडीवर होते. सभा सुरू झाल्यानंतर बागवान यांचे नाव मागे पडले. त्यांच्या जागी हरिदास पाटील यांना लाॅटरी लागली. महापौर निवडीवेळीही मैनुद्दीन बागवान यांची संधी हुकली होती. आता जमील बागवान यांना शब्द देऊनही त्यांचा पत्ता कट झाल्याने समर्थकांत नाराजी पसरली आहे.