सांगली : महापालिकेच्या स्थापनेला २२ वर्षांचा काळ लोटला तरी एकाच ठिकाणी सर्व कार्यालये नसल्याने नागरिकांना कामानिमित्त शहरभर फिरावे लागते. मुख्यालय एका जागी, तर इतर महत्त्वाची कार्यालये दूरवर आहेत. त्यात अधिकाऱ्यांचाही वेळ या कार्यालयाच्या भटकंतीमध्ये जातो. इतर शासकीय कार्यालये सुसज्ज झाली; पण महापालिकेची इमारत कधी सुसज्ज होणार? असा प्रश्न आहे.
महापालिकेकडून जन्म-मृत्यू दाखल्यापासून ते विविध परवान्यापर्यंत सारी महत्त्वाची कामे केली जातात. पाणीपुरवठा, कचरा उठाव, ड्रेनेज या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. महापालिकेच्या विविध कार्यालयात कामानिमित्त नागरिक, अधिकारी, नगरसेवकांची मोठी वर्दळ असते. पण, महापालिकेची सर्वच कार्यालये एकाच ठिकाणी नाहीत. राजवाडा चौकात मुख्यालय आहे. त्यात प्रभाग समिती एक, समाजकल्याण, नगरसचिव, लेखा विभागासह महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, गटनेते, आयुक्त, उपायुक्तांची कार्यालये आहेत. मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर नवीन इमारत उभी केली आहे, त्यात आरोग्य, लेखापरीक्षक, कामगार तर रिसाला रोडवर औषध निर्माण, भांडार कक्ष आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय हिराबाग आणि मंगलधाम अशा दोन ठिकाणी विभागाले आहे. मंगलधाम संकुलात नव्याने जन्म-मृत्यू, आपत्ती व्यवस्थापन, घरपट्टी, पाणीपट्टी विभाग आहे. सध्या मालमत्ता विभाग नेक्सच्या इमारतीत हलविण्यात आला आहे. स्टेशन चौकात अग्निशमन कार्यालय थाटले आहे; पण या कार्यालयाचे मुख्यालय नवीन वसाहतीत आहे. प्रभाग समिती दोनचे कार्यालय विश्रामबागला स्थलांतरित केले आहे, तर आरसीएचचे कार्यालय काळ्या खणीजवळील पाण्याच्या टाकीखाली सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी एखादे काम मुख्यालयात न झाल्यास विविध कार्यालयांत फिरावे लागते.
चौकट
अमरधाम नव्हे, मंगलधाम
जन्म-मृत्यू, घरपट्टी, पाणीपट्टीचे कार्यालय नव्याने मंगलधाम व्यापारी संकुलात थाटले आहे; पण बहुतांश नागरिकांना या संकुलाबाबत फारशी माहिती नाही. पूर्वी दाखल्यासाठी मुख्यालयात अर्ज स्वीकारला जात होता. त्यामुळे अनेक नागरिक, महिला मुख्यालयातच येतात. त्यांना मंगलधाममध्ये जाण्यास सांगितल्यास अनेक महिला अमरधामकडे जातात. तिथे पत्ता विचारतात, असे अनेक किस्से सध्या घडत आहेत.