सांगली : शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मीकी आवासमध्ये महापालिकेच्या वतीने बसविण्यात आलेले मोबाइल स्वच्छतागृह अज्ञाताने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेटवून दिले. फायबरचे स्वच्छतागृह जळून खाक झाले. याप्रकरणी स्वच्छता निरीक्षक धनंजय नामदेव कांबळे यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यात सात लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध उपनगरांमध्ये पथदर्शी प्रकल्पांतर्गत प्रत्येक विभागात मोबाइल स्वच्छतागृहे उभारली आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये येत असलेल्या जुन्या बुधगाव रस्त्यावरील वाल्मीकी आवासमध्येही अत्याधुनिक फायबरचे मोबाइल स्वच्छतागृह बसविण्यात आले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी ज्वालाग्राही पदार्थ टाकून हे स्वच्छतागृह पेटविल्याचा अंदाज आहे. बुधवारी महापालिकेचे कर्मचारी स्वच्छतेच्या कामासाठी गेले असता त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला. कर्मचाऱ्यांनी याबाबत स्वच्छता निरीक्षक कांबळे यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे. यात महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे अंदाजे सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.