मिरज : मिरजेत डेंग्यूसदृश आजाराच्या साथीमुळे नागरिक हैराण आहेत. महापालिका आरोग्य विभागाकडे कचरा वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या अब्दुल मुजावर (वय ४४, रा. खंडेराजुरी) या मानधनावरील कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. रक्तातील पेशी कमी व तापामुळे अब्दुल मुजावर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.
गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत नवव्या दिवशी मध्यरात्री गणेश तलावाजवळ कामावर असताना अब्दुल याच्यावर काही गावगुंडांनी हल्लाही केला होता. यावेळी हल्ल्यात तो जखमी झाला होता. मात्र त्यानंतर त्यास डेंग्यूची लागण होऊन उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी मृत्यू झाला. शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू आजाराने नागरिक त्रस्त आहेत. याकडे महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.