सांगली : महापालिका क्षेत्रातील मंगल कार्यालये, मल्टीपर्पज हाॅलमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी सहायक आयुक्तांना दिले. प्रसंगी ही कार्यालये सील करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आयुक्तांनी प्रभाग समितीचे सहायक आयुक्तांना सतर्क केले आहे. शासनाने मंगल कार्यालये, मल्टिपर्पज हाॅलमध्ये ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. पण अनेक कार्यालयात या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यासाठी सहायक आयुक्तांनी या कार्यालयात नियमांचे पालन होते की नाही याची शहानिशा करावी. उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालय चालक, मालक व आयोजकांवर दंडात्मक कारवाई करावी. पुन्हा या कार्यालयाकडून उल्लंघन झाल्यास ती १५ दिवसासाठी सील करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
सहायक आयुक्तांनी या कार्यालयांना वारंवार भेटी देऊन तपासणी करावी. या आदेशाच्या अंमलबजावणीत कसूर केल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.