सांगली : वर्षानुवर्षे थकीत असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे.
घरपट्टी, पाणीपट्टीकडील थकबाकीदारांची नावे चौका-चौकात डिजिटलवर झळकविली जाणार आहेत. तर मालमत्ता विभागाकडील कराच्या वसुलीसाठी नोटिसा धाडल्या जात आहेत. कर वसुलीच्या मोहिमेवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष लक्ष दिले असून, कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार हाती घेतल्यापासून उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. उत्पन्न व खर्चाचा मेळ घालण्यासाठी यंदा नगरसेवकांच्या विकासनिधीलाही कात्री लावली होती. आता मार्चअखेरीपर्यंत चालू व थकीत कर वसुलीवर भर दिला आहे. विशेषत: घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
घरपट्टी विभागाकडून जानेवारी महिन्यात दंड व शास्तीमध्ये सवलत देण्यात आली होती. त्यानंतर आता मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली आहे. आतापर्यंत ३५ कोटींपर्यंत कर वसुली झाली आहे. पाणी पुरवठा विभागाला यंदा २५ कोटींची चालू व थकबाकी वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग जोमाने काम करत आहे. विभागाचे उत्पन्न वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.पाणी पुरवठा विभागाने नवीन कनेक्शन वाढवण्याचेही धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे जुन्या कनेक्शन मागणीच्या फाईली निकाली काढण्यात आल्या आहेत. वर्षात ३४५६ कनेक्शन वाढली आहेत. यामुळे पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्न ३२ लाख वाढले आहेत.
मालमत्ता विभागाकडून चार वर्षांपासून गाळेधारक, खोकीधारकांना भाडेपट्टीची बिलेच देण्यात आली नव्हती. चंद्रकांत आडके यांच्याकडे मालमत्ता विभागाचा पदभार येताच त्यांनी मागील थकबाकीदारांना नोटिसा बजाविल्या आहेत. कर न भरल्यास गाळे जप्तीचा इशाराही दिला आहे. मार्चअखेरीपर्यंत महापालिकेला २५० कोटींपेक्षा अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे.