इस्लामपूर : येथील अनंतनगर परिसरात दोन कुटुंबांतील किरकोळ वादातून चुलत्याने कोयत्याने वार करत पुतण्यावर खुनीहल्ला केला. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेनऊच्यासुमारास घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुतण्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महेश प्रकाश इंगळे असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत त्याची आई वंदना प्रकाश इंगळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुुसार लक्ष्मण अशोक इंगळे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकाश इंगळे आणि लक्ष्मण इंगळे या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होता. त्याचा राग मनात धरून मंगळवारी रात्री साडेनऊच्यासुमारास लक्ष्मण इंगळे याने प्रकाश इंगळे यांच्या घरासमोर येऊन बॅरेलवर दगड मारून तो फोडला. तसेच सर्वांना शिवीगाळ करू लागला. यावेळी पुतण्या महेश बाहेर आला असता, चुलता लक्ष्मण इंगळे याने त्याच्या छातीवर आणि डाव्या पायावर कोयत्याचे वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरडा झाल्याने बाजूचे लोक घटनास्थळी आल्यावर हल्लेखोर लक्ष्मण इंगळे याने तेथून पोबारा केला.