सांगली : शहरातील माधवनगर रस्त्यावरील साखर कारखान्यासमोर तरुणावर चाकूने खुनीहल्ला करण्यात आला. प्रतीक दिनकर पाटील (वय २९, रा. वसंतदादा सहकारी साखर कारखाना वसाहत) असे त्या जखमीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत राजकुमार कदम (२१), सागर हणमंत पाटील (दोघेही रा. सोनी, मिरज), तन्वीर रेहमान कामीरकर (२३), अक्षय संजय पाटील (२१, दोघे रा. धुळगाव, ता. तासगाव) आणि अक्षय अजित पाटील (२०, रा. सांबरवाडी, ता. मिरज) अशी या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी पाटील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. प्रतीक रविवारी दुपारी कुमठेफाटा येथील एका ढाब्यावर जेवणासाठी गेला होता. त्यावेळी संशयित प्रशांत कदम आणि सागर पाटील हेही त्याठिकाणी होते. प्रतीक आणि संशयितांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संशयित माेटारीतून रात्री नऊच्या सुमारास कारखाना परिसरात आले. याठिकाणी पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. यातून संशयितांनी चाकूने प्रतीकच्या पोटात वार केल्यानंतर तो जखमी अवस्थेत कोसळला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते.
प्रतीक पाटील यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रतीकचे वडील दिनकर पाटील यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार रविवारी रात्री उशिरा पाचही संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी दिली.