इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील उदय चौकात मुलाने जन्मदात्या पित्यासह पत्नीवर लोखंडी गजाने हल्ला करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. बुधवारी रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दाखल झाली. पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली आहे. याबाबत पूनम महादेव देसाई (वय २४) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव कुमार देसाई याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या हल्ल्यात हल्लेखाेर महादेव याचे वडील कुमार बाळासाहेब देसाई, पत्नी पूनम महादेव देसाई हे जखमी झाले आहेत. महादेव देसाई याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महादेवचे पूनमशी लग्न झाल्याने वडील कुमार देसाई त्याला संपत्तीमध्ये वाटा देण्यास नकार देत हाेते. या कारणातून चिडून जाऊन महादेवने दोघांवरही लोखंडी गजाने हल्ला केला. यामध्ये दोघेही जखमी झाले. पूनमला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत पूनम देसाई हिने इस्लामपूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे आणि निरीक्षक नारायण देशमुख यांनी तपासकामी सूचना केल्या. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करत आहेत.