सांगली : प्रेमसंबंधातून मिरजेतील कॅरम क्लबमध्ये अक्रम मुख्तार शेख (वय २६, रा. मंगळवार पेठ, मिरज) याचा भरदिवसा गोळीबार व धारदार कुकरीने वार करुन अमानुषपणे खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोषी धरुन जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश वर्धन देसाई यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.अमीर गौस पठाण (२४) व मोजम हुसेन शेख (२२, दोघे रा. मंगळवार पेठ, मिरज) अशी शिक्षा झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. भरदिवसा गाजलेल्या या खून-खटल्याच्या निकालामुळे आरोपी व मृत अक्रमच्या नातेवाईकांनी सकाळपासूनच न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाने शिक्षा सुनावताच पोलिसांनी आरोपींना बाहेर काढून लागलीच त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसत नव्हता.मिरजेत झारी मशिदीजवळ एका इमारतीच्या तळघरात अक्रमने कॅरम क्लब भाड्याने चालविण्यास घेतला होता. अक्रमचे अमीर पठाण याच्या भावजयीशी प्रेमसंबंध होते. तो त्याच्या भावजयीला दुचाकीवरुन फिरवत असे. तो तिच्याशी विवाह करणार होता. अमीर पठाण व मोजम शेख या दोघांनी अक्रमला याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याने भावजयीशी प्रेमसंबंध सुरुच ठेवले होते. त्यामुळे हे दोघे अक्रमवर चिडून होते. यातून दोघांनी अक्रमच्या खुनाचा कट रचला.२२ फेब्रुवारी २०१५ रोजी अक्रम कॅरम क्लबमध्ये होता. ग्राहक खेळण्यास आले होते. दुपारी सव्वाएक वाजता अमीर पठाण व मोजम शेख क्लबमध्ये गेले. त्यांच्या हातात पिस्तूल व धारदार कुकरी होती. अमीरने अक्रमच्या छातीवर पिस्तूल रोखून गोळी झाडली. यामध्ये अक्रम उडून पडला. तसेच मोजमने अक्रमवर कुकरीने हल्ला चढविला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर मृत झाल्याची खात्री करुनच अमीर व मोजम तेथून निघून गेले होते.याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी तपास केला. अमीर व मोजमविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, तपास अधिकारी, पंच व प्रत्यक्ष घटना पाहणाºया ग्राहकांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.अक्रमवर कुकरीने ३४ वारअमीरने गोळीबार केल्यानंतर मोजमने अक्रमवर कुकरीने वार करण्यास सुरुवात केले. वार चुकविण्यासाठी अक्रमने हाताने अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा एक हात मनगटापासून तुटून पडला होता. तरीही मोजमने त्याच्यावर सपासप ३४ वार केले. हा प्रकार पाहून या खटल्यातील फिर्यादी व कॅरम खेळण्यास आलेले ग्राहक मोहसीन मुन्ना बेग हे बॉम्बे बेकरीच्या दिशेने पळून गेले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. न्यायालयाने अमीर व मोजमला जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
मिरजेतील दोघांना जन्मठेप- प्रेमसंबंधातून खून : तीन वर्षापूर्वी कॅरम क्लब घटनेचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 9:37 PM