मिरज : पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झालेल्या इचलकरंजीतील गुंडाचा दोनशे रुपयांसाठी मिरजेत दोघांनी लोखंडी सळई गळ्यावर मारून खून केला. योगेश हणमंत शिंदे (वय २८) असे मृताचे नाव असून, खूनप्रकरणी सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर, मिरज) व प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, गजानन हॉटेलजवळ) यांना पोलिसांनी अटक केली. येथील गजानन हॉटेलजवळील अभिनव बाल विद्यालय प्रताप कॉलनीत सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
मृत योगेशची पत्नी संगीता शिंदे (३०) यांनी गांधी चौकी पोलिसात पतीच्या खुनाची फिर्याद दिली आहे. न्यायालयाने दोन्ही संशयितांना एक दिवस पोलीस कोठडी दिली.
योगेश शिंदे इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार असून दोन खुनाच्या गुन्ह्यात तो कारागृहात होता. पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार होऊन मिरजेतील हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. मिरज रेल्वेस्थानकाजवळ प्रताप कॉलनीत तो पत्नीसोबत राहत होता. वेटरचे काम करून तो सलीम सय्यद व प्रकाश पवार यांच्यासोबत रेल्वेस्थानक परिसरात गोळ्या, बिस्कीट पॅकिंग करून विक्री करीत होता.
सोमवारी रात्री तिघांनी एकत्र बसून दारू पिल्यानंतर सय्यद व पवार यांनी हिशेबातील दोनशे रुपये योगेशकडे मागितल्याने वाद झाला. यावेळी सय्यद व पवार या दोघांनी योगेशवर लोखंडी सळईने हल्ला केला. या हल्ल्यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. पत्नी संगीताने आरडाओरडा केल्यानंतर सय्यद व पवार तेथून पळून गेले. हल्ल्यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली.
पत्नीसमोरच घडली घटना
मद्यपान केल्यानंतर दोनशे रुपयांसाठी वादावादी झाल्यानंतर योगेशने, ‘मी दोन खून केले आहेत, तुम्हालाही संपवून टाकीन’, असे धमकावले. यावेळी सय्यद व पवार यांना योगेश बाहेरून मिरजेत येऊन धमकी देत असल्याचा राग आला. त्यातून तेथे पडलेल्या सळईने दोघांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. योगेशच्या पत्नीसमोरच ही घटना घडल्याने पोलिसांनी दोघांना तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.