सांगली : शहरातील शंभरफुटी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासमोर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा तीन जणांकडून धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आला. संतोष तुकाराम पवार (वय २८, रा. जुने भबान रुग्णालयाजवळ, मोती चौक, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, गाड्यावर भुर्जी खाण्याच्या कारणावरून अथवा जुन्या वादातून खुनाचा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. काल, रविवारी ही घटना घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत संतोष पवार याचे शंभरफुटी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासमोर माउली एग जंक्शन या नावाने अंडाभुर्जीचा गाडा होता. मोटारीतच त्याने अंडाभुर्जी विक्रीची व्यवस्था केली होती. रोज ती मोटार लावून त्याठिकाणी व्यवसाय करीत असे. रविवारीही त्याने मोटार लावून तयारी सुरू केली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास तिघे जण तिथे आले व त्यातील एकाने संतोषवर एकच वार केला. यात तो खाली कोसळला.यानंतर थोड्या अंतरावर लावलेल्या दुचाकीवरून संशयित तिघेही तिथून निघून गेले. जाण्यापूर्वी त्यांनी मोटारीची तोडफोड करीत काच फोडून अंडी रस्त्यावर फेकली. घटनास्थळापासून काहीच अंतरावर विश्रामबागचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील गस्तीवर होते. घटनेची माहिती मिळताच, ते तिथे आला असता, संतोष निपचीत पडला होता. त्यांनी तात्काळ रिक्षात घालून त्यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. अविवाहित असलेल्या संतोषच्या लग्नाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली. मोती चौक परिसरात तो आईसह राहण्यास असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रविवार सुटीचा दिवस असल्याने व सायंकाळी वर्दळ असतानाच हा प्रकार घडल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
संतोषवर केवळ एकच वार
मृत संतोषवर हल्लेखोरांनी केवळ एकच वार केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोटाखाली हा वार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ दीड सेंटिमीटरची ही जखम असली तरी अंतर्गत रक्तस्राव झाल्याने, घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.