सांगली : शहरातील संजयनगर, झेंडा चौक परिसरातील तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. नितीन आनंदराव शिंदे (वय ३२ रा. संजयनगर, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या खुनात चारजणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नेमका कोणत्या कारणासाठी शिंदे याचा खून करण्यात आला याचा आता पोलिस तपास करीत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत शिंदे हा संजयनगर परिसरातच राहण्यास आहे. तो मालवाहतुकीचा व्यवसाय करत होता. त्याचे वडील लाकडाची वखार सांभाळतात. नितीन रविवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. तेथून औद्योगिक वसाहत रस्त्यावरील एका परप्रांतीय राहत असलेल्या खोलीत तो गेला होता. याठिकाणी चार संशयिताशी त्याची वादावादी झाली होती.अर्धा तासाने नितीन हा पुन्हा त्या घरात गेला. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयितासोबत त्याचा वाद झाला. वादावादी वाढत गेल्यानंतर संशयितांनी तिथेच असलेला गॅस स्टोव्ह नितीनच्या डोक्यात घातला. एकच घाव वर्मी बसल्याने तो निपचित पडला. यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.उपअधीक्षक जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. नितीन राहत असलेल्या घरापासून अगदी जवळच हा खून झाला. संशयितांशी त्याची किरकोळ वादावादी झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तरीही पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांद्वारे तपास सुरू केला आहे.एकच घाव..संशयितांनी नितीनसोबत वादावादी वाढत गेल्यानंतर तिथेच असलेला गॅस स्टोव्ह त्याच्या डोक्यात मारला. या स्टोव्हचा एकच घाव त्याच्या डोक्यात वर्मी लागल्याने तो निपचित पडला आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.
सांगलीत एकाचा गॅस स्टोव्ह डोक्यात घालून खून, कारण अस्पष्ट; संशयित पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 11:18 AM