घनशाम नवाथे/ सांगली : क्षणिक वादातून नवीन वसाहत येथे अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय ३०, नवीन वसाहत) याचा सातजणांनी धारदार शस्त्राने तसेच स्टंप, फरशीने मारहाण करून खून केला. मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून पाच संशयितांना तर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दोन संशयितांना अटक केली. संशयित सातजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
संशयित अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय २३, वडर गल्ली), सुजित दादासाहेब चंदनशिवे (वय २९, नवीन वसाहत), कुणाल प्रशांत पवार (वय २२), विकी प्रशांत पवार (वय २३, वडर कॉलनी), गणेश रामाप्पा ऐवळे (वय ३६, रा. गोकुळनगर), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (वय २८), अर्जुन हणमंत पवार (वय २२, वडर कॉलनी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत अश्विनकुमार मुळके याच्यावर पूर्वी मारामारीचा गुन्हा दाखल आहे. अलीकडे तो गुन्हेगारी कारवाईत नव्हता. बुधवारी रात्री एकच्या सुमारास नवीन वसाहत येथील गुरूद्वारजवळ घरासमोर अश्विनकुमार थांबला होता. तेवढ्यात संशयित विकी पवार हा तेथून दुचाकीवरून चालला होता. तेथून जाण्यासाठी रस्ता नाही असे अश्विनकुमारने सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर विकीने साथीदारांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे दुचाकीवरून सात संशयित मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास आले.
त्यांनी अश्विनकुमारला बोलवून धारदार शस्त्राने तसेच स्टंप, फरशीने हल्ला चढवला. अश्विनकुमारच्या पोटात खोलवर वार झाला. तो खाली पडला. अश्विनकुमारचा मित्र गणेश महादेव हाताळे हा वाचवण्यासाठी आला. त्याच्या डाव्या हातावरही शस्त्राने वार झाला. रात्रीच्या सुमारास आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाले. तेव्हा संशयित अंधारात पळाले. तिघांनी घटनास्थळी दुचाकी टाकली होती.
जखमी अश्विनकुमार व गणेश या दोघांना सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले. गुरुवारी सकाळी अश्विनकुमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. खुनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे व पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच तपासाबाबत सूचना दिल्या. विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या पथकाने तातडीने अजय, सुजित, कुणाल, विकी, गणेश या पाचजणांना अटक केली. तर गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, निलेश माने यांच्या पथकाने अमोल व अर्जुनला अटक केली.
संशयित रेकॉर्डवरील
संशयितांविरूद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गुन्हे आहेत. अजय हा हद्दपारीचा भंग करून सांगलीत आला होता. सुजयवर जबरी चोरीचे गुन्हे आहेत. गणेश हा मोकातील आरोपी असून जामिनावर बाहेर आला आहे. अमोल याची हद्दपारी संपलेली आहे. अर्जुनवर मारामारीचे गु्न्हे आहेत. इतरही रेकॉर्डवरील आहेत.