सांगली : शहरातील सावंत प्लॉट परिसरात एकाने मेहुण्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून, सासूलाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पत्नीशी असलेल्या वादातून हा प्रकार घडला असून याप्रकरणी वैभव बाळासाहेब नांदणीकर (वय २८, रा. कुपवाड) याच्याविराेधात प्रकल्प नितीन आडमुठे (२८) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी आडमुठे यांच्या बहिणीशी संशयित नांदणीकरचा विवाह झाला आहे. नांदणीकर आणि त्याच्या पत्नीत वाद असल्याने शुक्रवारी संशयित आडमुठे यांच्या घरी तो आला होता. घराच्या टेरेसवर तो प्रकल्प आडमुठे यांच्याशी चर्चा करत असताना संशयिताने धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी वैभवने प्रकल्प यांच्या आईसही लाथा-बुक्क्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विश्रामबाग पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.