सातारा : अंडी उधार न दिल्याच्या रागातून यशवतेश्वर कास रस्त्यावरील पॉवर हाऊसजवळ एका दुकानदाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.बबन हणमंत गोखले (वय ४२, रा. मंगळवार पेठ, पॉवर हाऊसजवळ सातारा) असे खून झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, यवतेश्वर कास रस्त्यावरील पॉवर हाऊसजवळ बबन गोखले यांचे पानटपरीमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. संशयित शुभम कदम (वय २०) आणि सचिन माळवे (वय २०)े यांनी दुकानात जाऊन गोखले यांना अंडी उधार मागितली. परंतु गोखले यांनी अंडी उधार देण्यास नकार दिला. त्यामुळे शुभम आणि सचिन घरी गेले.
काही वेळानंतर दोघेही परत दुकानाजवळ आले. त्यांनी गोखले यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दगड आणि धारदार शस्त्राने गोखले यांच्यावर त्यांनी हल्ला चढविला. गोखले रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडल्यानंतर दोघांनीही तेथून पलायन केले. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बबन गोखले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी एक पथक पाठविले.
गोखलेंसोबत वाद होताना एका व्यक्तीने पाहिले होते. त्यामुळे त्या व्यक्तीने संबंधित संशयित आरोपींची नावे सांगितली. पोलिसांनी तत्काळ शुभम आणि सचिनला त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.दरम्यान, पॉवर हाऊसपासूजन जवळच दोन दिवसांपूर्वी बजीरंग गावडे (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा खून झाला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा याच परिसरामध्ये खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.