घनशाम नवाते -
सांगली : विटा परिसरातील खुनातील संशयित लक्ष्मण आण्णा चौगुले (रा. विटा) हा वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृहात जाण्यापूर्वी आवारातून बेड्यासह पळाला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने खळबळ उडाली असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहे.
अधिक माहिती अशी, २०१८ मध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे. जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. गेल्या काही दिवसापासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता. तसेच पाय देखील लुळे पडत होते. त्यामुळे सांगलीत सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेथून त्याला कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये उपचारास पाठवले होते. तेथे दोन-तीन दिवस दाखल होता. त्यानंतर त्याला ससून रूग्णालयात उपचारास पाठवण्याची शिफारस केली होती.
लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते. तेथे उपचार केल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास त्याला घेऊन पोलिस सांगलीत आले. जिल्हा कारागृहात आतमध्ये सोडण्यापूर्वी अंधाराचा फायदा घेऊन लक्ष्मण हा बेड्यासह पळाला. त्यामुळे पोलिसांची पळापळ झाली. परंतू अवघ्या काही मिनिटात लक्ष्मण अंधारात पसार झाला होता. पोलिसांनी रात्रभर शोध मोहिम राबवली. परंतू तो हाती लागला नाही. त्यामुळे रविवारी त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे.