लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसगडे (ता. पलूस) येथील तरुणाचा बिसूर ते वाजेगाव रस्त्यावर डोक्यात लोखंडी गज घालून खून करण्यात आला. प्रशांत आदगोंडा पाटील (वय ३०) असे मृताचे नाव असून, गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. खूनप्रकरणी मृताचा चुलत भाऊ तेजस देवगोंडा पाटील (१८) याच्यासह त्याच्या मित्रास ताब्यात घेण्यात आले आहे. घर व शेतजागेच्या वादातून खुनाचा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत प्रशांत पाटील वसगडे येथील असून तो वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेच्या कवलापूर शाखेत कामास होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे तो पतसंस्थेतील काम संपवून दुपारी ४ च्या सुमारास घरी जात होता. यावेळी बिसूरच्या पुढे व वाजेगावच्या अलीकडे असलेल्या रस्त्यावर संशयितांनी त्याला अडवून त्याच्यावर लोखंडी गज, चाकू व दगडाने वार केले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
मृत प्रशांत व त्याच्या चुलत भावांमध्ये घर व शेतजमिनीवरून वाद होता, अशी माहिती आहे. याच वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृत प्रशांत एकुलता एक होता. त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. संशयित तेजस स्वत:हून भिलवडी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यास सांगली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा पूर्ण करत मृत प्रशांतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपासातून खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
चौकट
मृत प्रशांत आणि संशयितांमध्ये घर व शेतजमिनीवरून वाद होता. दोघांचेही शेतीचे अत्यंत कमी क्षेत्र होते, तर घराचीही कमी जागा होती. तरीही त्यांच्यातील वादामुळे शांत स्वभावाच्या तरुणाचा हकनाक बळी गेला.