कर्नाटक पोलिसात हा खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, सोनू भीमराव शेजूळ (वय २८, रा. करलहट्टी) यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, अरुण माने व सोनू शेजुळ हे दोघे मित्र होते. ते पत्रे ठोकण्याचे काम करण्यासाठी अथणी येथे सोमवारी गेले होते. रात्री येताना शिरूर येथील धाब्यावर त्यांनी दारू पिऊन जेवण केले. नंतर ते घरी येण्यासाठी निघाले. वाटेतच खिळेगाव-कोकळे रस्त्यावर कर्नाटक हद्दीत करलहट्टी गावाच्या काही अंतरावर त्यांच्यात पैशावरून वाद सुरू झाला. शेजूळ याने माने यास माझे पंधरा हजार दे, अशी मागणी केली. यावरून त्यांच्यात जोराचा वाद झाला. चिडलेल्या शेजूळ याने माने याच्या डोक्यात दगड घातला. तो जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर सोनू शेजूळ कवठेमहांकाळ पोलिसांत सोमवारी पहाटे ५ वाजता स्वतःहून हजर झाला. त्याने खुनाची कबुली दिली. परंतु गुन्हा कर्नाटक हद्दीत घडल्याने कवठेमहांकाळ पोलिसांनी त्याला अथणी पोलिसांच्या ताब्यात दिले. कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अथणी पोलिसांना तपासणी कामी सहकार्य करीत आहे.