फोटो : १६०४२०२१धनाजी टेंगले
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : दरीबडची (ता. जत) येथे युवकाचा धारधार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. धनाजी भागाप्पा टेंगले (वय १८, रा. टेंंगले वस्ती, दरीबडची) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. हा खून प्रेमसंबंधातून झाल्याची फिर्याद मृताचे वडील भागाप्पा टेंगले यांनी दिली. यावरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजू बाळू लेंगरे (२१, रा. पांढरेवाडी, ता. जत) आणि आदिनाथ हाके (१९, रा. खंडनाळ, ता. जत) अशी त्यांची नावे आहेत.
दरीबडची गावापासून पांढरेवाडी फाट्याजवळ टेंगलेवस्तीवर धनाजी टेंगले आई-वडिलांसोबत राहत होता. तो बारावीत कला शाखेत शिकत होता. गुरुवारी सायंकाळी तो दुचाकीवरुन (एमएच ४५ के ०२८१) डेअरीत दूध घालण्यास गेला होता. तेथून परत येताना कुलाळवाडी-दरीबडची रस्त्यावर हल्लेखोरांनी त्याची दुचाकी अडवून धारधार शस्त्राने डोक्यात, कानावर वार केले. यानंतर दुचाकी अंगावर टाकून अपघात झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. यानंतर हल्लेखोर पसार झाले.
ही घटना धनाजीच्या घरापासून चारशे मीटरवर घडली. मात्र, गाडी अडवून त्याचे तोंड दाबल्याने आवाज आला नाही. रस्त्यावर रात्री वर्दळ नसल्याने काहीच समजले नाही. धनाजी रात्री दहापर्यंत घरी आला नसल्याने वडिलांनी शोधाशोध सुरू केली. साडेदहाच्या दरम्यान तो घटनास्थळी जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात नेले. डोक्यावर व कानावर वर्मी घाव लागल्याने तेथे त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.
धनाजीचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र राजू लेंगरे याच्याशी तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. राजूने याबाबत धनाजीला सांगूनही त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे राजूने चिडून आदिनाथच्या मदतीने हा खून केल्याचे भागाप्पा धाऊबा टेंगले यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
धनाजीचे आई-वडील ऊसतोडणी मजूर आहेत. भाऊ बिहार येथे सोने-चांदी दुकानात कामाला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
चाैकट
नावाच्या गोंधळातून महिलेने जीव गमावला
टेंगले वस्तीवर धनाजी टेंगले नावाचे दोघेजण आहेत. त्यातील धनाजी महादेव टेंगले याचे दरीबडचीत सोना-चांदीचे दुकान आहे. तोही रात्री कामानिमित्त रात्री घराबाहेर गेला होता. मृत धनाजी भागाप्पा टेंगले व धनाजी महादेव टेंगले यांची घरे हाकेच्या अंतरावर आहेत. मृत धनाजीची बातमी वस्तीवर समजली. धनाजी महादेव टेंगले यांची आई प्रीताबाई टेंगले यांनाही धनाजीचा खून झाल्याची माहिती समजली; पण आपलाच धनाजी मृत झाला असा त्यांचा समज झाला. यातून त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व पहाटे त्यांचे निधन झाले.