सांगली : येथील संजयनगरमध्ये सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर, सांगली) यांचा किरकोळ वादातून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. निरंकार कॉलनी ते सूर्यनगर कॉलनीदरम्यान रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तीन हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. दरम्यान, रात्री उशिरा एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संजयनगरमधील बांधकाम साहित्य व्यावसायिक आणि दशनाम गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुभाष बुवा कार्यरत होते. शनिवारी रात्री त्यांना काही जणांनी घरातून बोलावून घेतले. सूर्यनगर कॉलनीतील रस्त्यावर तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. तोंडावर, छातीवर, पोटावर असे एकापाठोपाठ अकरा वार झाल्याने बुवा जागीच ठार झाले.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बुवा यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच त्यांची पत्नी व मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेतच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनीही भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या.बुवा यांचा संजयनगर परिसरात बांधकाम साहित्याचा व्यवसाय होता. याचबरोबर सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांचा काही तरूणांशी वाद झाला होता. या वादातून शुक्रवारी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. काचा फोडणाऱ्यांपैकी एका संशयिताचे नाव समजल्याने बुवा यांनी संजयनगर पोलिसांत तक्रार दिली होती. बुवा यांच्या तक्रारीनंतर संबंधित संशयितास पोलिसांनी बोलावून घेतले होते. त्यांच्यात आपसात चर्चा झाल्यानंतर हा वाद मिटविण्यात आला होता. त्यामुळे त्या वादाची पोलिसांत नोंद झाली नव्हती.
शनिवारी रात्री निरंकार कॉलनीच्या परिसरातच राहणाºया एका व्यक्तीने बुवा यांना घरातून बोलावून नेले. त्या व्यक्तीबरोबरच बुवा सूर्यनगर कॉलनी परिसरात गेले असल्याची माहिती पुढे येत आहे. प्राथमिक तपासात तिघा संशयितांनी बुवा यांच्यावर हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एका संशयितास रात्री उशिरा ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.शासकीय रूग्णालय परिसरात गर्दीदशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष म्हणून काम करणाºया बुवा यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचे समजताच संजयनगरमधील नागरिकांनी शासकीय रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. निरंकार कॉलनी परिसरात राहणारे सुभाष बुवा दशनाम गोसावी समाजासह इतर सामाजिक कार्यातही अग्रेसर होते.कुटुंबियांचा आक्रोशबुवा यांच्यावर हल्ला होताच त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शासकीय रुग्णालयात बुवा यांची पत्नी आणि मुलांचा आक्रोश सुरू होता. वडिलांवर झालेला हल्ला पाहून एक मुलगा बेशुध्द पडला. संजयनगरचे पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी रुग्णालयात येऊन बुवा यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.सांगलीत शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुभाष बुवा यांचा खून झाल्याचे समजताच उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.सांगलीतील संजयनगर येथे शुक्रवारी सुभाष बुवा यांच्या मोटारीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या होत्या.