देवराष्ट्रे: सोनहिरा परिसर हा सागरेश्वर व चौरंगीनाथ डोगरांदरम्यान वसला आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरुम, दगडाची तस्करी वाळवा तालुक्यात केली जात आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तहसीलदारांकडून २० ब्रास खुदाईचा परवाना मिळवला जातो, मात्र याचा गैरवापर करत शेकडो ब्रास मुरुमाची राजरोसपणे खुदाई केली जात आहे.सोनहिरा हा डोंगराळ परिसर आहे. या परिसरात ताकारी योजनेच्या कालवा खुदाईचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे परिसरात मुबलक प्रमाणात दगड व मुरुम उपलब्ध आहे. परिसरातील सोनसळ, सोनकिरे, शिरसगाव, पाडळी, आसद, मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, अंबक, चिंचणी, शिरगाव या परिसरातून मोठ्याप्रमाणात मुरुम व दगडाची तस्करी होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोजक्याच कारवाया करून अनेक तस्करांना सोडून दिले. त्यामुळे कारवाईची भीती न राहिल्याने कुंडल, वाळवा, भवानीनगर परिसरात तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. यातील काही तस्करांना राजकीय अभय असल्याचीही चर्चा आहे.
ताकारी योजनेच्या कालव्यावर खुदाई केलेला मुरुम व दगड मोठ्या प्रमाणात आहे. तस्कर कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता दिवस-रात्र जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने खुदाई करून डंपर, ट्रॅक्टरमधून याची बेकायदेशीर वाहतूक करतात.रखवालदार गप्पकडेगाव तहसील कार्यालयातून २० ब्रास मुरुम खुदाई व वाहतुकीचा परवाना दिला जात आहे. मात्र या परवान्याच्या जोरावर तस्करी करणारे शेकडो ब्रास मुरुम खुदाई करून वाहतूक करत आहेत. दिवस-रात्र शासनाच्या नैसर्गिक खजिन्यावर माजलेले तस्कर दरोडो घालत असताना, रखवालदार मात्र गप्प का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.