सांगली : सांगलीच्या राम मंदिर चौकात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रामनवमीचा जल्लोष रंगला. मध्यरात्रीस गर्दी संपली, आणि मागे रस्त्यावर उरला ढिगभर कचरा. तो पाहून रमजानच्या तराबीनंतर घरी परतणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे हात सफाईसाठी सरसावले. पहाटे दोनपर्यंत अवघा चौक टकाटक करुन सोडला.राम-रहिम आणि ईश्वर-नबी या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग म्हणजे मानवता आणि समाजसेवा असल्याचे मुस्लिम श्रद्धाळूंनी कृतीतून दाखवून दिले. देशभरात कट्टरतावाद चिंताजनकरित्या फोफावत असल्याच्या काळात भाईचाऱ्याच्या धाग्याची वीण घट्ट केली. धार्मिक सलोख्यासाठी सदैव अग्रेसर असलेल्या सांगलीकरांनी असा एकोपा वेळोवेळी कृतीतून दाखवून दिला आहे. त्याचा कधी गाजावाजाही केलेला नाही.
गुरुवारी दिवसभर साथीदार फाउंडेशन आणि राम मंदिर चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे भक्तीपूर्ण वातावरणात रामजन्मोत्सव साजरा झाला. हजारो भाविकांनी रांगा लावून श्रीरामाचे दर्शन घेतले. सायंकाळी मुख्य कार्यक्रम उशिरापर्यंत रंगला. मध्यरात्री संपला, तेव्हा चौकात सर्वत्र कचरा पसरला होता. भाविकांनी व कार्यकर्त्यांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कागदाचे रंगीबेरंगी कपटे, उधळलेली फुले अशा कचऱ्यामुळे रस्ता माखून गेला होता.दोन तासांत चौक चकाचकमहापालिकेचे सफाई पहाटे साफसफाई करणार होते, पण तत्पूर्वीच मुस्लिम कार्यकर्ते पोहोचले. तराबीनंतर घरी परतणाऱ्या मुस्तफा मुजावर यांनी स्वच्छता सुरु केली. सावली बेघर केंद्रातील रहिवासी आणि इन्साफ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेतले. मध्यरात्री बारापासून पहाटे र्सफाईनंतर चौकात कचऱ्याचा एकही कपटा उरला नाही. गोळा केलेला कचरा सकाळी महापालिकेच्या गाडीतून डेपोवर गेला. सकाळी सांगलीकर दिनक्रमासाठी बाहेर पडले, तेव्हा स्वच्छ चाैक पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले.
मी धार्मिक कट्टरतावाद कधीच जोपासला नाही. आजवरच्या वाटचालीत मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांतील व्यक्तींनी वेळोवेळी पाठबळ दिले आहे. गुरुवारी सायंकाळी रामजन्मोत्सवाच्या आनंदात सहभागी झालो. रात्रीच्या नमाजनंतर घरी परतताना उत्सवाच्या मंडपासमोर सफाईदेखील केली. या कामात हिंदू-मुस्लिम मित्रांनी मदत केली. - मुस्तफा मुजावर, सामाजिक कार्यकर्ता