सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात खरेदीदस्ताचे बनावट कागदपत्र तयार करून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अजय श्रीधर चावला (रा. शामरावनगर, सांगली) यांनी बाबगोंडा पाटील, रफिक जित्तीकर, सुरेश पाटील व फिराज जित्तीकर (सर्व रा. सांगली) यांच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी चावला यांचा शामरावनगरमध्ये प्लॉट आहे. चावला यांच्या नावावर ही जागा असताना संशयितांनी खरेदीदस्ताचे बनावट कागदपत्र बनवून ही सहा गुंठे जागा दुसऱ्याच्या नावावर करून घेतली. चावला यांच्या नावावर ही जागा असल्याचे माहीत असूनही संशयितांनी तिची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचे चावला यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्याचबरोबरच संशयितांनी पुन्हा या जागेवर आलात तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.