सांगली : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यात ही मोहिम पहिल्या फेरीत 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 व दुसऱ्या फेरीत 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत नेमण्यात आलेल्या पथकामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची गृहभेटीव्दारे तापमान व SPO2 तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिली.जिल्हा परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती आशा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या, जिल्ह्यात ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रात एकूण 28 लाख 57 हजार 463 लोकसंख्या असून 5 लाख 71 हजार 493 घरे आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीची गृहभेटीव्दारे तापमान व SPO2तपासणी करण्यात येणार आहे.
तिव्र श्वसनाचे आजार आणि फ्लू सदृश्य आजार सर्व्हेक्षण, रूग्ण आढळल्यास कोविड चाचणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. कोमॉर्बीडीटी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन उपचार सुरू नसल्यास मोफत उपचारासाठी संदर्भ सेवा दिली जाणार आहे.
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी 150 वैद्यकिय अधिकारी व 3 हजार 284 कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.
प्रत्येक पथकात आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्वयंसेवक या पथकाव्दारे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे 1 डॉक्टर उपचार व संदर्भासाठी असणार आहे. प्रत्येक पथक प्रथम फेरीमध्ये दैनंदिन 50 घरांना भेटी देईल व व्दितीय फेरीमध्ये 75 घरांना भेटी देईल.गृहभेटीदरम्यान ताप 100.4 अंश फॅ. किंवा जास्त, SPO2 मध्ये 95 टक्केपेक्षा कमी, खोकला आणि इतर लक्षणे असणारे कोमॉर्बीड रूग्ण आढळल्यास ताप उपचार केंद्रामध्ये संदर्भीत करण्यात येणार आहेत. रूग्णाची कोविड-19 तपासणी करून पुढील उपचार केले जातील.
जिल्हा परिषदेच्या 60 मतदारसंघात कोविड-19 कालावधीत ज्या स्वयंसेवकांनी चांगले काम केले आहे त्यांना प्रत्येक मतदारसंघनिहाय प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांकास अनुक्रमे 1500 रूपये, 1000 रूपये व 500 रूपये बक्षिस देण्यात येणार असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त बाधित रूग्ण शोधून लवकर उपचाराखाली आणणे व मृत्यूदर कमी करणे असा उद्देश असल्याचे ते म्हणाले.