विकास शहा,शिराळा : कांदे (ता. शिराळा) येथील एका महिलेने माझे पती आत्महत्या करीत आहेत त्यांना वाचवा मला पोलिसांची मदत हवी आहे असा कॉल ११२ क्रमांकावर केला. त्याची तातडीने दखल घेत शिराळा पोलिसांनी हालचाली केल्या. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.
कांदे (ता. शिराळा) येथील भीमनगरमध्ये आशिष जगन्नाथ शिवजातक (वय ३१) हे पत्नी मोनिका, सहा महिन्यांचा मुलगा व आईसह राहतात. शिवजातक दांपत्यामध्ये काही कारणांनी भांडण झाले होते, त्यामुळे गुरुवारी (दि. १८) मोनिका माहेरी मोहरे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे निघून गेल्या होत्या. यानंतर आशिष हा पत्नी मोनिका यांना वारंवार फोन करीत होता. शुक्रवारी सायंकाळी त्याने मी आत्महत्या करणार आहे, असे मोनिका यांना सांगितले.
त्यामुळे मोनिका यांनी पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर तातडीने संपर्क केला. पती आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्याची दखल घेत पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या सूचनेनुसार हवालदार सूर्यकांत कुंभार, अरुण मामलेकर लगेच शिवजातक यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता.
पोलिसांनी शंका आल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा आशिष साडीने गळफास लावल्याच्या स्थितीत आढळला. पोलिसांनी त्याला तात्काळ खाली उतरवले. त्यावेळी तो बेशुद्ध होता. त्याला त्वरित शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर घरी सोडले आहे.