सांगली : दारू दुकानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते महापालिकेने ताब्यात घ्यावेत, यासाठी आपण कुठलीही शिफारस केलेली नाही. हा विषयही आयुक्तांसमोर काढलेला नव्हता. एका नगरसेवकाने या विषयावर मत मांडले. रस्ते ताब्यात घेण्याशी खासदार म्हणून काहीही संबंध नाही. महापालिकेची बजबजपुरी करणाऱ्यांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाल्याचा खुलासा करीत खासदार संजयकाका पाटील यांनी रस्ते हस्तांतरणास आपला वैयक्तिक विरोधच आहे, अशी भूमिका सोमवारी पत्रकार बैठकीत मांडली. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आपण महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची भेट घेतली होती. या बैठकीत शेरीनाला योजनेसंदर्भात चर्चा केली. पण काहीजणांनी दारू दुकाने वाचविण्यासाठी रस्ते ताब्यात घ्यावेत, अशी चर्चा केल्याची आवई उठविली. विकास, चांगल्या कामांना खीळ कशी बसेल, हाच उद्योग ही मंडळी करीत आहेत. महापालिकेची बजबजपुरी केलेल्या या मंडळींचा मला बदनाम करण्याचा डाव होता. याच्या मुळाशी जाऊन त्यांचा शोध घेऊ. संजयकाका काय आहे, हे या मंडळींना दाखविल्याशिवाय राहणार नाही. पालिकेतील एका नगरसेवकाने रस्ते ताब्यात घेण्याबाबत आयुक्तांकडे विचारणा केली. तेव्हा आपणच हा विषय महापालिका व राज्य शासनाचा आहे, यात माझा संबंध येत नसल्याचे स्पष्ट केले होते. महापालिकेत भाजपचे तीन नगरसेवक आहेत. त्यांच्या जिवावर आम्ही ठराव कसा सहमत करून घेऊ शकतो? दारू दुकानदारांची सुपारी घेण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काही दिवसांपूर्वी गोसावी गल्लीतील दारू दुकान बंद करण्याबाबत महिलांनी आंदोलन केले होते. त्यांना सहकार्य करावे, म्हणून जिल्हा पोलिस प्रमुखांना सूचना केली होती. महापालिका हे रस्ते करू शकणार नाही. त्यामुळे ते ताब्यात घेण्यास वैयक्तिक विरोधच आहे. या रस्त्याचे मी हस्तांतरण करण्यासाठी कशासाठी आग्रह धरू? काही मंडळींना या विषयावर राजकारण करायचे आहे. दहा वर्षांपूर्वी या मंडळींची काय ऐपत होती, आज काय आहे? निवडून येण्याची ऐपत नसलेल्या या मंडळींना आता सरळ केल्याशिवाय राहणार नाही, असेही संजयकाका पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
...हा माझ्या बदनामीचा डाव
By admin | Published: April 17, 2017 11:25 PM