कडेपूर : राजकारणामध्ये गेली वीस वर्षे कार्यकर्त्यांच्या जिवावर टोकाचा संघर्ष केला. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. याची दखल पक्षाचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी मला विधानसभा परिषदेत काम करण्याची संधी दिली. या संधीचा उपयोग मतदारसंघ व जिल्ह्याच्या विकासासाठी करू, असे प्रतिपादन आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार देशमुख प्रथमच कडेगाव तालुका दौऱ्यावर आले होते. कडेगाव येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर जाहीर सभा झाली. आ. विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.आमदार देशमुख म्हणाले, संपतराव देशमुखअण्णांच्या निधनानंतर निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय आमच्या कुटुंबाने घेतला होता. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढविली. मी आमदार झालो. १९९९ नंतर आजअखेर कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक साथीने संघर्ष करीत आहे. या सर्व संघर्षात कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली.आ. जगताप म्हणाले की, पृथ्वीराज देशमुख यांचा संघर्ष खूप मोठा आहे. त्यामुळे प्रचंड अडचणी असताना, पक्ष एकसंध व अभेद्य ठेवला आहे.
घोरपडे म्हणाले की, मतदारसंघाच्या घड्या उघडल्या आहेत. देशमुख यांच्यारूपाने न्याय मिळाला. येणाºया विधानसभेला संग्रामसिंह देशमुख यांना आमदार करून इतिहास घडवा.यावेळी कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदा करांडे, पलूस पंचायत समितीच्या सभापती सीमा मांगलेकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, सयाजीराव देशमुख, तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, मजूर फेडरेशनचे नेते सतीश देशमुख, जयदीप देशमुख उपस्थित होते.‘त्यांचे’ भाजपमध्ये स्वागत!पलूस-कडेगाव मतदार संघाचे प्रतिनिधी जर भाजपमध्ये येणार असतील, तर आम्ही देशमुख बंधू त्यांचे स्वागत करायला तयार आहोत. जर पक्ष वाढत असेल, तर आम्हाला सर्वजण सारखेच असल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी जाहीर केले.