मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतील १४ दुकाने रविवारी रात्री फोडण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ७२ तासांच्या आत तिघा चोरट्यांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. हे तिघेही सांगली जिल्ह्यातील असून, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याकामी सीसीटीव्ही फुटेजची मदत झाली आहे. याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणीच्या मुख्य बाजारपेठेतील १४ दुकाने एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केली होती. बाजारपेठेतील अजिंक्य पतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संबंधित संशयित कैद झाले होते. या फुटेजच्या आधारे मायणीचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड व सहकाऱ्यांनी केवळ ७२ तासांच्या आत या चोरीतील तिघा चोरट्यांना गजाआड केले आहे. संबंधितांनी चोरी (केल्याचे कबूल केले आहे. मुख्य बाजारपेठेतील पूनम गारमेंट, शतायुषी प्लायवूड, त्रिमूर्ती गारमेंट, सद्गुरू किराणा, समर्थ किराणा, रब्बाना फुटवेअर, सिकंदर बेकरी, सई कापड दुकान, मंगलमूर्ती मेडिकल, दिवटे यांचे किराणा दुकान, बाळासाहेब माने यांचे भांड्याचे दुकान, रहिमतुल्ला शेख यांची गिफ्ट गॅलरी, सुभाष माने यांचे हार्डवेअर दुकान आदींसह १४ दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी अठरा हजारांची रोखड लंपास केली होती. त्यावेळी चोरट्यांनी अन्य कोणत्याही वस्तूला हात लावला नव्हता. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, हवालदार राघू खाडे, नितीश काळे, अरुण बुधावले, गुलाब दोलताडे, संजय देवकुळे, अशोक वाघमारे, नाना कारंडे या सर्वांनी सापळा रचून मंगळवार, दि. १३ रोजी सकाळी प्रकाश श्रीरंग जाधव (वय २९, रा. मादळमुटी, ता. खानापूर जि. सांगली), सुधाकर अशोक मोहिते (२७) आणि संभाजी ऊर्फ भास्कर सुखदेव सावंत (२२, दोघेही रा. कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)
मायणी चोरीतील टोळी गजाआड !
By admin | Published: April 13, 2016 11:06 PM