इस्लामपूर : वाळवा विधानसभा मतदार संघातून सन १९७८ मध्ये प्रा. एन. डी. पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरोधात जनता पक्षाकडून राजारामबापू पाटील, काँग्रेसकडून विलासराव शिंदे अशी तिरंगी लढत राज्यात लक्षवेधी ठरली होती. यामध्ये विलासराव शिंदे निवडून आले. परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन झाले. यामध्ये एन. डी. पाटील यांचा पराभव होऊनही त्यांना सहकारमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर काही कालावधीतच जनता पक्षाचे राजारामबापू पाटील यांचा महसूलमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.एन. डी. पाटील यांनी सहकारमंत्री असताना सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर मोठा भर दिला होता. सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या चारित्र्यावर आरोपाचा एकही शिंतोडा उडू दिला नव्हता. सहकारातील कामाबरोबरच त्यांनी शेतीच्या क्षेत्रातही मोठे काम केले आहे. शासनाच्या कृषी विभागामध्ये नोकरभरती करताना कृषी पदविका आणि पदवीधरांना प्राधान्य देण्याचे धोरण त्यांच्याच काळात अवलंबिले.प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची जन्मभूमी वाळवा तालुक्यातील ढवळी या गावात आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत: कोल्हापूर हीच आपली कर्मभूमी मानून त्यांनी जनसामान्यांसाठी अनेक लढे उभे केले. समाजातील पीडित, वंचित घटकांसह कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या या योध्दाच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण वाळवा तालुका त्यांच्या आठवणीने शोकसागरात बुडाला.
एन. डी. पाटील निवडणुकीत हरले, पण मंत्री झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 3:24 PM